पलीकडे!

एखाद्याने यावं आणि एखादं आमिष दाखवून गायब व्हावं!
असंच काहीसं माझ्यासोबत होतंय. हल्ली मीच भविष्यातून माझ्या वर्तमानाला खुणावतेय. मीचं माझ्यावर हसणं, किती वाईट!
पलीकडची मी आणि इथली मी, दोघींमध्ये बराच फरक जाणवतो.
एखादी serial सुरू असतांना मधेच ad सारखं
येऊन मला स्वप्न दाखवून जाणं, आणि पुन्हा सगळं सुरळीत असतांना मी ‘तिचाच’ विचार करणं,माझं रोज काचेचं आवरण तुटण्याची वाट बघणं आणि रोज, रोज त्या पलीकडच्या जगात जाण्यासाठी व्याकुळ होणं, कितपत योग्य आहे?
आमच्यात अंतर जरी फार नसलं तरी मार्ग ही स्पष्ट नाही, दार दिसत असलं तरी पलीकडे जाण्यासाठी वाट मात्र सापडत नाही.
आणि काहीही असलं तरी माझं भविष्य सतत माझ्या पुढेच असणार. म्हणजे पलीकडे असणारी ‘मी’कायम मलाच खुणावत राहणार! असं असतांना मी नेहमीच वर्तमान खराब करावा का?
उद्याच्या काळजीने आपण ‘आज’ का खराब करावा ?
आपली प्रत्येक सकाळ एक नवीन अनुभव देण्यासाठीच असते, आणि पलीकडे जाण्याची ‘वाट’ म्हणून जन्माला येते!
म्हणून हीच एक -एक पायरी आनंदाने चढत जाउया, कोणास ठाऊक कदाचित उद्याच पलीकडचं दार उघडण्याची संधी आपल्याला मिळेल!

                                          

पंख!

संध्याकाळची वेळ होती , पक्षी आपल्या घरट्याकडे वळत होते. कुहू तिच्या आजोबांसोबत झोपाळ्यावर बसली होती. तेव्हा तिच्या मनात विचार आला की मलाही पंख हवेत , पक्षांसारखं मलाही उडायचंय. कितीवेळ हाच विचार तिच्या मनात घोळत होता. शेवटी रात्री झोपताना तिने आईला विचारलं,
       आई, मला का ग उडता येत नाही
            दोन हात, दोन पाय तसे
            दोन पंख का मला नाही
           ( पुढे थोडासा चेहरा पाडून)
         छोटे छोटे पक्षी पण उंच उंच उडतात
समोरच्या झाडावर बसून सारखे मला चिडवतात
    पंखांच्या या दुनियेत का मला जागा नाही
    सांग ना आई मला का बरं उडता येत नाही
         पोपटाला माझ्यासारख बोलता येतं
         मोराला माझ्यासारख नाचता येतं
       मग मलाच का त्याच्यासारखे पंख नाही
      सांग न आई मला का ग उडता येत नाही
       तू तर मला लाडाने परी पण म्हणतेस
       मग फक्त गोष्टीतली परीच का ग उडते
    गोष्टीतल्या परीसारखे का मला पंख नाही
   सांग ना आई , मला का गं उडता येत नाही!
असं म्हणून कुहू हट्ट करते , तेव्हा कसंबसं आई तिला झोपवते . दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिला बाजूला दोन पंख दिसतात . ते बघून ती आनंदाने आईकडे धावत जाते आणि तिच्याकडून ते पंख बांधून घेते . मग काय, घरभर सगळ्यांना पाठीवरचे पंख दाखवत फिरते. मग शेवटी आई आपल्या कामाला लागते .पण कसलं काय? 10 min परत पुन्हा कुहू आईकडे रडत येते . आईने कारण विचारताच( हुंदके देत म्हणते) मला पंख असूनही अजून उडता येत नाही , त्यावर आईला हसू येतं, असं काहीतरी होईल याची तिला कल्पना होतीच.
आई कुहूला मांडीवर घेऊन समजावताना सांगते की , असे दोन पंख सगळ्यांकडे असतात! तेव्हा कुहू आश्चर्याने आईकडे बघत म्हणते , म्हणजे तुलाही आहेत का ग पंख? तेव्हा आई म्हणते, हो मग….
आपल्या सगळ्यांनाच दोन पंख असतात! ते दोन पंख म्हणजेच…. आपले आई -बाबा !
पुढे समजावताना आई तिला म्हणते त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या पंखांना उडण्याचं बळ मिळतं ! पण आपलं उड्डाण त्यांच्या स्वप्नाकडे असावं, तेव्हांच आपल्याला हवं ते मिळतं! असं म्हणत आई कुहूला कुरवाळते ,आणि आपल्या मिठीत घेते !
आईचं बोलणं कुहूला फार समजलं होत अस नाही, पण आई वर तिचा पूर्ण विश्वास असल्याने तिने पंखांचा हट्ट सोडला आणि डोळे पुसून लगेच खेळायला गेली!

गुरुपौर्णिमा!

सकाळची वेळ होती. जवळच चहाच्या टपरीवर सुंदर जुनी गाणी लागलेली होती . अचानक माझं लक्ष समोरच्या प्रचंड मोठ्या झाडाकडे गेलं. त्याखाली पाटीवर लिहिलं होतं 203 वर्ष! त्या झाडाच्या फांद्या दूरवर पसरल्या होत्या आणि खोड पण अगदी जीर्ण झालेलं तरी ते झाड अगदी ऐटीत उभं होतं! पण रस्त्यावरून जाणारे लोकं गप्पांमध्ये गुंग असल्याने त्यांचं झाडाकडे लक्ष नव्हतं…मला फार वाईट वाटलं. कदाचित त्या झाडालाही वाटलं असावं, शेवटी सजीवचं ना ते! कारण सिद्ध झालंय हे की त्यांनाही मन असतं आणि सगळं काही कळतं असतं! बघा ना ,माणसांसाठी ते सावली म्हणून उभं असतं तर पक्षांसाठी घर म्हणून ….कोणी तुणच्याकडे पहातय की नाही, काळजी घेतंय की नाही , हा कसलाच विचार न करता, निर्विवाद सेवा त्यांच्याकडून घडत असते. हाच त्यांचा गुण शिकण्यासारखा आहे! आज कितीतरी दिवस झाले, मी रोज तिथे जाते. आज तर गुरुपौर्णिमा आजही मी जाईन ,कारण न बोलताही त्यानं मला खूप काही शिकवलंय ! असंच या निसर्गात अनेक सजीव आहेत, जीव जंतू आहेत, जे त्यांच्या कृतीतून खूप काही शिकवून जातात! म्हणूनच या निसर्गरूपी गुरूचे स्मरण- पूजन गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून करावं!

ती धावतेय!

आज खास करण्यासारखा असं काहीच नव्हतं.परीक्षा पण झाली त्यामुळे कशाची काळजी नाही. रोज पळणारं ते घड्याळ आज कसं अगदी संथपणे चालत होतं. एका पुस्तकात मी वाचलं होतं `tempus fugit’ म्हणजेच वेळ धावत आहे! खरं तर कधी कधी वाटतं ,थांबावं तिनेही जरा वेळ. पण ती मात्र भारी उत्सूक! सतत पळत असते प्रत्येकाला काहीतरी देण्यासाठी . ज्याच्याकडे दुःख असतं त्याला सुखाचे क्षण देते आणि जो कोणी सुखी अथवा समाधानी असेल त्याला नवीन अनुभव देते. म्हणूनच तर म्हणतात ना वेळ खूप काही शिकवून जाते ! प्रत्येकाच्या account मध्ये काही आकडे लिहिलेत तेवढं आपलं आयुष्यं असतं आणि तिने दिलेली वेळ पण! म्हणजेच आपल्या account मधून रोज असे कितीतरी आकडे कमी होतात…. मग आपण त्यासाठी काही खास असं करतो का? म्हणजेच रोज आपली वेळ एकाच गोष्टीत यश मिळवण्यासाठी का खर्ची घालावी ? सगळ्या गोष्टी शिकण्यात का भर देऊ नये? फिर चाहे कितनी भी देर लग जाये! सगळ्या गोष्टींसाठी ते वेळेच आकडे वापरा. नाहीतर एकाच गोष्टीमागे पळता पळता ते account NULL व्हायचं! कारण हातात घड्याळ असलं म्हणजे वेळ हातात आहे असं होत नाही ना! आणि हो, कुठली ही गोष्ट शिकण्या आधी वेळेचा विचार करावा वयाचा नव्हे! कारण ती धावत आहे!